उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. महायुतीच्या जागा वाटपाबाबत सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या जागा सर्वाधिक असतील असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा भाजप जास्त जागा लढवणार आहे. दरम्यान, त्यांनी मविआवर खरपूस टीका केली आहे. मविआतील प्रत्येक पक्षात गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण मुख्यमंत्री पदासाठी तयार असल्याचे म्हणत सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
"अजित दादा बारामतीमधून लढणार नाहीत हे जाणीव पूर्वक पसरवलं जात आहे. अजितदादा आणि बारामतीकरांचे मागील 40 वर्षांपासूनचे अतूट असे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. त्यांना बारामतीच्या विकासाचे महामेरू म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवार बारामतीमधूनच लढतील", असे तटकरे यांनी ठासून सांगितलं.
"ईव्हीएमकडे बोट दाखवणे हा काँग्रेसचा पळपुटेपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात विजय मिळाला तो त्यांच्या कर्तृत्वावर, ओमर अब्दुल्ला काश्मीरमध्ये जिंकले तर ते कर्तुत्वावर आणि हरियाणात काँग्रेस हरली तर ईव्हीएमला दोषी मानत आहेत. मतमोजणी पूर्वी सगळेच चॅनल काँग्रेसला बहुमत मिळणार असं सांगत होते." अशी टीका दरम्यान सुनील तटकरे यांनी केली आहे.