काल 11 नोव्हेंबरला विस्तारा या विमान वाहतूक कंपनीच्या विमानाने शेवटचे उड्डाण केले. विस्ताराची शेवटची फ्लाइट ‘UK 115’ सोमवारी रात्री 11.45 वाजता दिल्लीहून सिंगापूरला निघाली. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमान वाहतूक कंपन्या टाटा समूहाच्या असून विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे.
आज (12 नोव्हेंबर) एअर इंडिया कंपनीच्या विलीनिकरनानंतर विस्तारा-एअर इंडियाच्या पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाण केलं आहे. सोमवारी रात्री 10.07 वाजता एअर इंडिया-विस्तारा युनिटचे ‘AI2286’ या कोडचे पहिले उड्डाण दोहाहून मुंबईसाठी रवाना झाले आणि मंगळवारी सकाळी मुंबईला पोहोचले.
एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर युनिटचे हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण आहे. या विलीनीकरणानंतर, विस्तारित एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 25.1% भागीदारी असणार आहे.
विस्तारा तिकीट असलेले 1,15,000 हून अधिक प्रवासी विलीनीकरणानंतर पहिल्या महिन्यात एअर इंडियाच्या नावाने उड्डाण करतील. विस्ताराचा अनुभव बदलला जाणार नाही, अशी ग्वाही देखील एअर इंडिया कंपनीने दिली आहे. विलीनीकरणानंतर विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट कोडमध्ये ‘2’ हा अंक जोडला जाईल. उदाहरणार्थ, विस्ताराचा फ्लाइट कोड UK955 होता, जो आता AI2955 होईल.