दिल्ली : केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ (Agnipath) योजनेमुळे देशात एक नवा वाद उभा राहिला आहे. चार वर्ष सैन्यामध्ये सेवा करण्याची संधी आम्ही तरुणांना देत आहोत असं केंद्र सरकारने (Central Government) म्हटलं आहे. तर विरोधकांनी मात्र हा बेरोजगारांच्या फौजा निर्माण करण्याचा कार्यक्रम आखल्याचं म्हटलं आहे. यामुळे बिहार (Bihar) आणि अन्य काही ठिकाणी उग्र स्वरुपातली आंदोलनं सुरु झाली असून, या योजनेच्या विरोधात लाखो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. तरुणांनी टोलनाके, रेल्वे आणि सरकारी मालमत्तांची जाळपोळ आणि तोडफोड केली आहे. यावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहेत.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना आतापर्यंतच्या वेगवेगळ्या निर्णयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी आज एक ट्विट करत केंद्रावर टीका केली आहे. "अग्निपथ तरुणांनी नाकारलं, कृषी कायदा शेतकऱ्यांनी नाकारला, नोटाबंदी अर्थतज्ज्ञांनी नाकारली, जीएसटी व्यापाऱ्यांनी नाकारला...देशातील जनतेला काय हवं आहे हे पंतप्रधानांना समजत नाही. कारण त्यांना त्यांच्या 'मित्रांच्या' आवाजाशिवाय दुसरं काहीही ऐकू येत नाही." असा गंभीर आरोप केला आहे.
तसंच आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, रँक नाही, पेन्शन नाही. २ वर्षापासून थेट भरती नाही. 4 वर्षांनंतर स्थीर भविष्य नाही. सैन्याबद्दल आदर नाही. देशातील बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका, त्यांना 'अग्निपथ'वर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नका असं आवाहन राहुल गांधींनी केलं आहे.