2006 Varanasi Bomb Blast : गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने वाराणसीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 4 जून रोजी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती.
साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी वलीउल्लाहला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी हा निर्णय दिला. 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट स्टेशनवर मालिका स्फोट झाला होता. या प्रकरणी तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला आहे. यापूर्वी 23 मे रोजी वाराणसी बॉम्ब प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती. खटला सुरू होण्यापूर्वी आरोपी वलीउल्लाहला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णयासाठी 4 जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि रेल्वे कॅन्टमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. यासोबतच दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला होता. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद येथे सुनावणीसाठी हलवण्यात आलं होतं.