गजानन वाणी, हिंगोली
उध्दव ठाकरे यांनी संविधानाला हात लावाल तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही असं विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, एक गोष्ट लक्षात घ्या संविधानाला हात लावण्याचा प्रश्नच नाही आणि देश पेटवणं हे राजकीय पक्षाच्या लोकांनी अशी भाषा करणं या देशाच्या नागरिकांना आवडत नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, देशामध्ये शांतता आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन, पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करतंय. घटनेचं संरक्षण करण्यासाठी, घटनांना सुरक्षित ठेवण्यासाठी, घटना ही देशासाठी आगळा- वेगळा माझ्या माहितीप्रमाणे जो ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे याच्याबद्दल शंका कुशंका कोणाला करायची गरज नाही. घटनेमध्ये कोणताही बदल होणार नाही. घटना बदलली जाणार नाही. हे वारंवार पंतप्रधान मोदी बोलले, गृहमंत्री बोलले, मुख्यमंत्री बोलले, उपमुख्यमंत्री बोलले. परंतु विरोधी पक्षांना कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. मला असं वाटतं कि ते जे बोलतात हे राजकीय द्वेषापोटी बोलतात.
आज महाराष्ट्राचा स्थापना दिवस आहे. अशा प्रकारची भाषा बोलणं चुकीचं आहे. आज कामगार दिवस आहे. आपल्या राज्याच्या बद्दल चांगली प्रतिमा व्हावी. देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सर्वात प्रथम राहावं. याच्यासाठी एकमेकांनी प्रयत्न करावा सत्ताधारी असो, विरोधी असो यांचे दोघांचही कर्तव्य आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देताना कुठेही देशामध्ये, राज्यामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशा गोष्टी नाही केल्या तर चांगलं होईल. असे अब्दुल सत्तार म्हणाले.