विकास माने, बीड
बीडमधील रंकाळा ग्रुप विविध सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतो. याबरोबरच आरोग्याच्या बाबतही या ग्रुपचे सदस्य जागरुक असतात. प्रत्येकाने दररोज सकाळी 6 वाजता चंपावती क्रिडा मंडळाच्या मैदानावर न चुकता हजेरी लावायची हा शिरस्ता ठरलेला. यात खंड करणार्या मित्राच्या घरी सर्वजण मिळून मेजवानीसाठी जाणार, हे ठरलेले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेली ही मंडळी सकाळचे दोन तास नियमीतपणे व्यायाम करत इतरांनाही यासाठी प्रवृत्त करतात.
मात्र या ग्रुपचे सदस्य बळीराम गवते यांनी व्यायामाला हजेरी न लावल्याने सर्व सदस्यांनी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, एव्हढ्यात कोणीतरी बँडबाजावाल्यांना बोलावून घेत सवाद्य त्यांच्या घरी पोहचले. अचानक झालेला हा प्रकार पाहून गवते कुटूंबीयही प्रारंभी गडबडून गेले, परंतु सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांच्याच चेहर्यावर हसू फुलले. बँडबाजासह दाखल झालेल्या या मंडळींना नंतर मेजवानी देऊनच परत पाठवले हे वेगळे सांगण्याची गरज नाही! मात्र सध्या या अनोख्या मित्रत्वाची जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगते आहे.