पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान आणि निर्णायक नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यापार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. लहान मुलांसाठी पीएम केअर फंडांतर्गत योजनाचं लोकार्पण करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. 2014 पूर्वी देश घोटाळे आणि घराणेशाहीच्या गर्तेत अडकला होता, अशी टीकाही त्यांनी केलं.
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज जेव्हा आमचं सरकार आठ वर्षे पूर्ण करत आहे, या देशाचा आत्मविश्वास, देशवासियांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. 2014 पूर्वी हजारोंचे घोटाळे, भ्रष्टाचार, घराणेशाही, देशभरात पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव या सगळ्यामुळे देश एका विखारी चक्रात अडकला होता".
तसेच "गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने जी उंची गाठलीये, त्याची कल्पना यापूर्वी कोणी केली नसेल. आज भारताची मान जगभरात उंचावलेली आहे. आपल्या भारताची शक्ती जागतिक व्यासपीठांवर वाढलेली आहे. आणि मला आनंद आहे की हा भारताचा प्रवास युवकांच्या नेतृत्वाखाली होत आहे". असे नरेंद्र मोदी यांनी विधान केले आहे.