अमरावती : सुरज दहाट | अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार विशेष शिबिराचे आयोजन जैनपूर येथे करण्यात आले होते.
शुक्रवारी (दि. 24) या शिबिराचा समारोप झाल्यामुळे महाविद्यालयाच्या माध्यमातून हे विद्यार्थी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून दर्यापूरला येत होते. दरम्यान, जैनपूर गावाबाहेरील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटून अपघात झाला. या अपघातात ट्राॅलीमधे असलेले 22 विद्यार्थी जखमी झाले.
अगदी वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असताना ट्रॅक्टर पलटी झाला. सध्या अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्वोतोपरी उपचार सुरू आहेत. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेऊन महाविद्यालय प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले आहे.