करोनाविरूद्धच्या लढ्यात आता आणखी एक लस भारतात येणार आहे. आपत्कालीन वापरासाठी मुंबईतील औषधनिर्माण कंपनी सिपलाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मॉडर्नाच्या करोना लसी आयात करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. लवकरच सरकारकडून यासंदर्भात घोषणा होऊ शकते. यापूर्वीच अमेरिकेने 'कोवॅक्स' च्या माध्यमातून भारताला मॉडर्ना लसी देणार असल्याचे मान्य केले होते. तसेच, त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) कडून मान्यता मागितली होती. वृत्तसंस्था एएनआयने ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
अमेरिकेच्या फार्मा मेजरच्या वतीने सिप्लाने डीसीजीआयला या लसींच्या आयात व विपणन अधिकृततेसाठी विनंती केली होती. त्यानंतर आता डीसीजीआयने सिपला कंपनीला ही लस आयात करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारतात लसीकरण मोहिमेअंतर्गत ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे. आता मॉडर्ना लस भारतात आल्यानंतर नागरिकांना चौथा पर्याय उपलब्ध होणार आहे.