मुंबईतील राजीव गांधी वांद्रे-वरळी 'सी लिंक' पुलावरील टोल शुल्कात सुमारे 18 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियमित वांद्रे-वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल वाढीमुळे सध्याच्या कार आणि जीपचे टोल 85 रुपयावरून 100 रुपयावर जाणार आहे. तसेच मिनीबस टॅम्पो आणि इतर वाहनांमधील प्रवाशांना 130 रुपयावरुन 160 रुपये आकारले जाणार आहेत. तर एकेरी प्रवासासाठी 175 रुपये आणि दोन एक्सेल ट्रकसाठी 210 रुपये आकारले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची तात्काळ अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून होणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
दरम्यान, माहिम, दादर, प्रभादेवी, वरळी भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम उपनगरातील वाहनधारक या सागरी सेतूचा उपयोग करत असतात. तर याच सागरी सेतूला आता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सागरी किनारा मार्गसुद्धा जोडण्यात येत आहे. हा सागरी किनारा रस्ता वांद्रे वरळी सेतूला जोडल्यास यावरुन जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे.