अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केला. खुद्द रश्मिकापासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्हिडिओ एडिट करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. आता थेट केंद्र सरकारने या घटनेची गांभीर्याने घेतली आहे.
या प्रकरणात शासनानं माहिती व तंत्रज्ञान अॅक्ट २००० च्या ६६ डी नुसार संगणकाच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास होणारी कारवाई. अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूद्वारे केलेला प्रयत्न ज्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मलिन केली जाईल त्यावर या अॅक्टनुसार कारवाई करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार दोषीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.
शासनाच्या त्या समितीनं सोशल मीडियावर रश्मिकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची बारकाईनं पाहणी केली आहे. त्यातून रश्मिका ही एका लिफ्टमधून बाहेर पडताना दिसते. तो व्हिडिओ बराचवेळ सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय होता.
प्रत्यक्षात त्या व्हिडिओची तपासणी केली असता तो ब्रिटिश इंडियन इन्फ्ल्युंसर झारा पटेलचा असल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीनं मॉर्फ करण्यात आला होता. पटेलच्या जागी रश्मिकाचा फोटो वापरण्यात आला होता.
दरम्यान, डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकानं एक पोस्ट शेअर केली होती. रश्मिकानं लिहिलं की, मला खूप वाईट वाटतंय, पण मला ऑनलाइन व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओ बद्दल बोलावच लागेल. खरंच सांगते, की हा डीप फेक व्हिडिओ माझ्यासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच एक भीतीदायक असा प्रकार आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळं आज आपलं प्रचंड नुकसान होतंय. तसंच अशा प्रकाराला आणखी लोक बळी पडतील, त्याआधीच यावर तोडगा काढायला हवा. यावर लक्ष देण्याची गरज आहे, असंही रश्मिकानं म्हटलं आहे.