जुई जाधव | मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना ऐतिहासिक असा एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करू, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेल नाही आणि त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनावर जाणार आहेत. यामुळे मविआने दिलेले आश्वासन शिंदे सरकार पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात एसटी कर्मचारी यांचा मोठा संप झाला. या संपामध्ये त्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची साथ मिळाली. हे आंदोलन तब्बल 8 महिने सुरु राहिलं. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्रिसदस्यीय समिती गटीत केली आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग करू, असं सांगितलं होतं. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांच्या 18 मागण्यांपैकी केवळ 2 मागण्या पूर्ण झाल्या आणि उर्वरित 16 मागण्या अपूर्ण राहिल्या.
राज्यात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, आता हे सरकार असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आता तर एसटी कर्मचारी यांना वेळेवर पगार देखील मिळत नाही. यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.