अनिल ठाकरे|चंद्रपूर : सात वर्षाच्या चिमुकलीने थेट एसपी कार्यालय गाठलं. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर ती उभी झाली अन् वडिलांची थेट तक्रार करू लागली. माझे पप्पा गाडीवर जाताना हेल्मेट घालत नाहीत, त्यांना हेल्मेट घालायला तुम्ही सांगा असा हट्ट तिने केला. गोड आणि निरागस लहानग्या मुलीचा हट्ट बघून जिल्हा पोलीस अधीक्षकही भारावले. त्या मुलीनं सोबत हेल्मेटही आणलं होतं. अधीक्षकांच्या उपस्थितीत तिने वडिलांना हेल्मेट दिलं. प्रवासाला निघताना हेल्मेट घालणार, असं तिने वडीलांकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांनपुढे वदवून घेतलं. या मुलीच नाव आहे शुभ्रा पंढरी सिडाम. कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये तिचे वडील कार्यरत आहेत.
हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचं सांगणारे पोलीस हेल्मेट न घालता प्रवास करतात असे नाही. मात्र योगायोगाने हेल्मेट न घालता प्रवास करताना कोरपणा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पंढरी सिडाम यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना डोक्याला इजा झाली. हेल्मेट घातलं असते तर डोक्याला इजा झाली नसती हे सात वर्षाची मुलगी शूभ्रा पंढरी सिडाम हिच्या लक्षात आलं. तिने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेतली. माझ्या पप्पांना हेल्मेट घालायला सांगा असा हट्ट तिने अधीक्षकांकडे केला. परदेशी यांनी तिच्या वडिलांना बोलावलं. तिने सोबत हेल्मेट आणलं होतं. ते हेल्मेट अधीक्षकांपुढे तिने वडिलांना दिलं. आणि दुचाकीने प्रवास करताना हेल्मेट घालूनच प्रवास करणार अस तिनं वडीलांकडून वदवून घेतलं. वडीलावर ती जीवापाड प्रेम करते हे अधीक्षकांना दिसलय. तिचा निरागस हट्टातून प्रवासात हेल्मेट वापरणे किती गरजेच आहे हेही दिसून आलं.
ती फार गोड मुलगी आहे. तिचा निरागस हट्ट बघून काय बोलावं काय बोलू नये असं मला झालं होतं. एका सात वर्षाच्या मुलीला प्रवास करताना हेल्मेट किती गरजेचे आहे हे कळलं होतं. पोलीस विभागाकडून वारंवार हेल्मेट घालण्याच्या सूचना केल्या जातात. कार्यवाही केली जाते. तरीही उल्लंघन होतं.