टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा आज पालघर येथे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशातील अनेक दिग्गज व्यक्तींनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्वीट करून मिस्त्री यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट करून मिस्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच राज्यातून देखील दिग्गज व्यक्तीने त्यांचा मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू स्तब्ध करायला लावणारा आहे. देशाच्या आर्थिक शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे निधनाने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या आणि मित्रांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,”अशा भावना मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, 'पालघरजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची बातमी कळताच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो,' असे ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे. याबरोबरच या अपघाताबाबत पोलीस महासंचालकांसोबत चर्चा झाली असून या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कसा झाला अपघात
सायरस मिस्त्री ज्या मर्सिडिज कारने प्रवास करीत होते त्या गाडीचा नंबर MH-47-AB-6705 हा होता. अपघात दुपारी साडे तीनच्या सुमारास अहमादाबाद मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर झाला. मर्सिडिज कार डिव्हायडरला आपटल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मिस्त्री आणि त्यांच्या सोबतचे सर्व रस्त्याच्याकडेला पडून होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांना कासाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यातील दोघांना मृत घोषित करण्यात आले. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.