आज पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार बघायला प्रचंड लोक त्या ठिकाणी आले होते. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील पैलवानांसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेतून आज महाराष्ट्राला 65वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळाला. त्यासाठी चार जबरदस्त आणि ताकदवान मल्लांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलेला होता. त्यातच अंतिम सामन्यात पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात चुरशीची लढाई झाली. परंतु, सामना चालू झाल्यावर अवघ्या 55 सेकंदात महाराष्ट्राला शिवराज राक्षे यांच्या रूपाने 65वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळाला.
उपांत्य सामन्यात माती विभागातून पै महेंद्र गायकवाडने पै सिंकदर शेखचा पराभव केला. तर मॅट विभागातील उपांत्य सामन्यात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट केले. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी लढाई झाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला.
काय मिळणार बक्षीस?
केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख 5 लाख रुपये आणि महिंद्रा थार गाडी तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी गदा ही सागाच्या लाकडापासून बनवण्यात येते. यावर चांदीचे नक्षीकाम असते. गदेचे वजन जवळपास 8 ते 10 किलो इतकं असतं.