विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल आहे. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. आता यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं असून एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही असे शरद पवार (sharad pawar) यावेळी म्हणाले.
मविआ सरकार बनण्यापूर्वीही अशी बंडाळी झाली होती. हे तिसऱ्यांदा घडलंय. याआधी दोनदा असे प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्या वेळी भाजपने आमदारांना हरयाणाला नेलं होतं. मात्र राज्यात मागच्या अडीच वर्षांपासून सरकार निट चाललं असल्याचं पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री कुणाला बनवायचे हे सेना ठरवेल
एकनाथ शिंदे मुख्यंत्री होणार का, यावर बोलताना पवारांनी मोठा खुलासा केला. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चालू आहे. आत्ता विधानपरिषदेलाही क्रॉसवोटिंग झालं. ते नेहमी होतं. मात्र सरकारला काही धोका नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.
सध्या निर्माण झालेल्या या राजकीय पेजामधून मार्ग निघेल याची नक्की खात्री असल्याचं पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये दोन ते तीन वेळा अधोरेखित केलं. विधान परिषदेमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बोलताना शरद पवारांनी, क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालतं हा ५० वर्षांचा अनुभव आहे, असं उत्तर दिलं.