राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे (shivsena) संजय राऊत (sanjay raut) आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) हे दोन्ही उमेदवार आज (26 मे) दुपारी 1 वाजता विधान भवनात अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) या वेळी उपस्थित राहणार आहेत.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संजय राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर दुसऱ्या जागेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
बुधवारी संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. गुरूवारी अर्ज भरणार असल्याने पवारसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे महाविकास आघाडी भक्कमपणे असल्याने दोन्ही उमेदवार गुलाल उधळतील, अशी ग्वाहीही पवारांनी दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.
संभाजीराजे यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, "संभाजीराजेंना शिवसेनेची 42 मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत" असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.