राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी आज (10 मे) कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत बोलताना न्यायालयाच्या निकालाबाबत गैरसमज झाल्याचंही पवारांनी बोलून दाखवलं. 15 दिवसांत निवडणुका घ्या, असं कोर्टानं सांगितलेलं नाही, तर 15 दिवसांत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, असं न्यायालयानं सांगितलंय असं मला वाटतं, असं पवार म्हणाले.
"निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींना वाटतंय की निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढावी. तर काही जणांनी एकट्यानं निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. यावर पक्षात सविस्तर चर्चा होऊन येत्या काळात निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले. तसंच कोर्टानं १५ दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले नाहीत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक 15 दिवसात जाहीर करा हा गैरसमज आहे. मला वाटतं या निवडणूक प्रक्रियेला दोन-अडीच महिने लागतील. जिथं थांबवलं तिथून सुरू, करा असा आदेश असल्याचं पवारांनी म्हटलं. कोर्टाच्या कोणत्याही बाबींवर खूप बोलण्यासारखं आहे. पण तुम्हाला ही नोटीस येईल आणि मलाही येईल, असं पवार म्हणाले.
'एकीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांना जामीन दिला जातो, मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईत भाजप महाविकास आघाडीला वरचढ ठरत आहे का?' असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं? बोलण्यासारखं भरपूर आहे, पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल.