सूरेश काटे | सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता अविनाश भानुशाली याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आज दुपारच्या सुमारास कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात एक लाखाची लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले.धक्कादायक बाब म्हणजे भानुशाली याने यापूर्वी 4 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
अभियंत्याने बांधकामांचे मुल्यमापन केल्यानंतर त्याचा अहवाल देण्याच्या मोबदल्यात एका ग्रामस्थाकडून आधी ४ लाख रुपये उकळून होते. त्यानंतर त्याने पुन्हा पैशांसाठी तगादा लावला. त्यानंतर या लाचखोर अधिकाऱ्याला कल्याणच्या पिडब्ल्यूच्या कार्यालयात सापळा लावून अटक करण्यात आली. कार्यालयातच अटक झाल्यामुळे कल्याण – डोंबिवलीत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अविनाश पांडुरंग भानुशाली ( ५७ ) असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण शाखेत शाखा अभियंता ( वर्ग – २) पदावर कार्यरत आहे.लाचविरोधी पोलिसांनी अचानक टाकलेल्या रेडनंतर सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज, त्यानंतर कल्याणचा तहसीलदार दीपक आकडे आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला लाच स्विकारताना अटक झाली आहे.