प्रशांत जगताप | सातारा : जिल्हा न्यायालयातील खासगी वकिलाला 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी खासगी वकिलाला अटक केली आहे. विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे खासगी वकिलांचे नाव असून 2 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 1 लाख रुपये स्वीकारताना कुलकर्णी यांना रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हे स्वातंत्र्य संग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या वतीने सातारा दिवाणी न्यायालय यांच्या दाखल प्रोबेट अर्ज क्रमांक 16/ 2020 चा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्याकरता लोकसेवकावर प्रभाव पाडून विलास कुलकर्णी यांनी तक्रारदारांकडे 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपअधिक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, खासगी वकिलावर झालेली ही आतापर्यंतची पहिलीच मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये वकील विलास कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.