उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनच्या कांड्यांची गाडी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे एनआयएच्या कस्टडीत आहे. यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांनी गृहमंत्र्यांवर टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर आता मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ झाली आहे. या सर्व घटनाक्रमांनंतर गुन्हे शाखेतील तब्बल ६५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून त्यात निलंबित सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या सीआययू पथकातील अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल अडचणीत सापडल्यामुळे मंगळवारी निरीक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये गुन्हे शाखेच्या ६५ पोलिसांचा समावेश आहे.
ॲंटिलिया स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या हत्येत सचिन वाझेसह काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस दलात फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मंगळवारी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.