मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. खंडणीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.परमबीर सिंह यांच्यासोबतच इतर ८ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
बांधकाम व्यावसायिक केतन मनसुखलाल तन्ना यांनी त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकावलं जात होतं, असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचं जालान यांनी सांगितलं.या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांसोबतच इतरही अनेकांची नावं आहेत. त्यामध्ये विमल अगरवाल, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ, जुबेर मुजावर, मनीष शाह, रितेश शाह, बच्ची सिंह, अनिल सिंह यांची नावं गुन्ह्यामध्ये आहेत. विमल अगरवाल केतन तन्ना यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणी मागत होता, तर त्यांची पत्नी केतन तन्ना यांच्या पत्नीला घाबरवत होती, असं देखील सोनी जालान यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या आधी देखील परमबीर सिंह यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे.