राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित झाला आहे. गेल्या वर्षातही अनेक महिने राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं. अशा परिस्थितीत डोंबिलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आयडीबीआय बँकेच्या खात्यातून तब्बल 30 ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बँक प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
डोंबिवली पूर्व भागातील फडके रोडवर आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेत असलेल्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गहाळ झाल्याची बातमी कळताच बँकेत गर्दी झाली. माहिती समोर आली की, एक दोन नाही तर अनेकांचे पैसे ऑनलाईन काढण्यात आले आहेत. या संबधी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ज्या लोकांच्या बँकेतून ऑनलाईन अचानक पैसे कापले गेले त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. खातेदारांनी पोलिसांना सांगितले की, कमीत कमी 50 खातेदारांच्या खात्यातून पैसे गहाळ झाले आहेत. मात्र पैसे गहाळ झाल्यानंतर बँकेकडून जी प्रक्रिया करण्यास सांगितली गेली, ती सुद्धा ग्राहकांना त्रसदायक होती. एकीकडे पैसे गेले. दुसरीकडे प्रक्रियेत तासंतास गेल्याने खातेदार हैराण झाले. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे, अशी खातेदारांची मागणी आहे.