महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) नं परीक्षापद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा आता UPSC सारखी लेखी स्वरूपाची असेल. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होणार आहेत. लोकसेवा आयोगानं पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT) अर्हताकारी करण्याचा निर्णय आयोगानं मागील महिन्यांत घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून होणार आहे.
कशी असेल परीक्षा
नव्या नियमानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल त्यात एकूण 9 पेपर असतील.
मुख्य परीक्षेत भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे असेल. प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असणार आहेत.
सामान्य अध्ययन विषयात एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
मुलाखत कशी असणार
मुलाखतीसाठी 275गुण असतील. या पद्धतीनं एकूण गुण 2 हजार 25 गुणांची ही परीक्षा असेल. त्याचबरोबर एकूण 24 वैकल्पिक विषयातून उमेदवारांना एक विषय निवडता येईल. या विषयांची यादी देखील आयोगानं जाहीर केली.
राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.