अमोल धर्माधिकारी | पुणे : मागील 24 तासांपासून राज्यात दमदार पाऊस सुरु आहे. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. तसेच, रस्तेही जलमय झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तर, पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुणे शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सर्व शाळा उद्या बंद ठेवण्याच्या आदेश पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या शाळा बंद राहणार आहेत. तर, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सर्व शाळा उद्या बंद असल्याचे जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमधील शाळा आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.
दरम्यान, पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. तर, कात्रज जुना बोगदयाजवळ दरड कोसळली असून रस्यावर सात ते आठ मोठे दगड आले आहेत.