मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र कॅसिनो कायदा अखेर रद्द करण्यात आला आहे. तर, गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1976 पासून राज्यात कॅसिनो कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधायक रद्द करण्याची घोषणा केली होती. यानुसार राज्यातून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
'हे' आहेत महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय
- राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव.
- गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा.
- आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार.
- मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी.
- महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द.
- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.
- सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे.
- दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
- मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.