मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. यात शिवसेनेच्या 40 आमदारांचाही समावेश होता. यामध्ये आणखी एक आमदार सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यात आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, यावर साळवी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात कोकणातून आणखी एक आमदार प्रवेश करण्याची चर्चा असून यात राजन साळवी यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, राजन साळवी यांनी ट्विटरवरुन या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी. काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहे, असे साळवी यांनी म्हंटले आहे.
तसेच, निष्ठेचे प्रमाणपत्र 15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे. मला खोक्याची गरज नाही, असा टोलाही राजन साळवी यांनी शिंदे गटाला लगावला आहे. यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेब राजन साळवी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षिस देताना दिसत आहेत. यामुळे राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडे सध्या कोकणात 3 आमदार आहेत, यात राजन साळवी, वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे. यापैकीच एक आमदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहेत. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला आमदार राजन साळवी यांनी अनूकुलता दर्शवली. तर, काहीच दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली होती. यामुळे राजन साळवी यांच्या नावाची चर्चा होत आहे.