नागपूर : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून राजकारण चांगलंच तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच तो संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता, असे त्यांनी म्हंटले आहे.
वरूण सरदेसाई म्हणाले की, ओरिजिनल व्हिडिओ कुठे आहे. प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव राज सुर्वे यांनी तो व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह केला होता. यामुळे अटक करायची असेल तर आधी त्याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आमचं सरकार गेल्यापासून आमच्या नेत्यांवर कारवाई वाढली आहे. ते भाजपमध्ये गेले की शुद्ध होतात. हे जनतेला रूचलेल नाही. म्हणून त्यांना नागपूर-कसबामध्ये पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे बालेकिल्ले ढासळत चालले आहेत. आगामी लोकसभेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत हेच निकाल पाहायला मिळतील, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला.
दरम्यान, आम्ही विद्यापीठ निवडणुका आता गांभीर्याने लढत आहे.नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक महा विकास आघाडी मिळून लढत आहे. यात आमचे तीन उमेदवार आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.