राज्यात एकिकडे राजकीय गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मुघल बादशाह औरंगजेबावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाच्या पोस्टर आणि स्टेटसवरून राज्यात अनेक ठिकाणी दंगली आणि राडा घडल्याच्या घटना समोर आल्या. त्यातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या भेटीनंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले होते. यावरच आता उद्धव ठाकरेंनी यावर थेट प्रतिक्रिया न देता भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पत्रकार परिषदेत माध्यमांकडून ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. परंतु ते म्हणाले, जेव्हा आमची युती (शिवसेना-भाजपा) होती. तेव्हा लालकृष्ण अडवाणी जिन्नाहच्या (मोहम्मद अली जिन्नाह) कबरीवर गेले होते. तसेच नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आपले पंतप्रधान केक खायला गेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. मला असे वाटते, लोकांना आता इतिहासात अडकवून ठेवण्यात ऐवजी नव्या विचारांसह पुढे जावे. असे ते म्हणाले.
पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळेला निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर मग तिकडे जय बजरंग बली करायचं, कधी दाऊदचा चेहरा, तर कधी औरंगजेबाचा चेहरा वापरायचा, असं सगळं सुरू आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे हे 'औरदंगाबाद' आहेत, मी त्यांना 'औरदंगाबाद' म्हणतो. कारण यांना केवळ दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचा आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.