मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. यावरुन विरोधक आता आक्रमक झाले असून टीकास्त्र डागलं आहे. तर, उध्दव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची तोफ डागली आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, अनेकदा असं वाटतं, भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय तर त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची. ह्याला काही मोकळ्या वातावरणातल्या निवडणूका म्हणता होत नाही. आमच्या शंका-कुशंकांसाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहीले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा विश्व हिंदू परिषदेने जरी दिला असला तरी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी बुलंद केला. १९८७ सालच्या पार्ल्यातील निवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने प्रचार केला आणि जिंकली. या निवडणूकीत भाजप आमच्या विरोधात होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेच्या ५ ते ६ आमदारांचा लोकशाहीतील मूलभूत असा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून मतदानाचा हक्क सहा वर्षांसाठी हिरावून घेतला, अशी घटना त्यांनी सांगत ते पुढे म्हणाले, परंतु, आता निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत बदल केलेत, असे आम्हाला वाटतंय. बदल केले असतील तर ते आम्हाला कळायला हवेत. ते सर्वांसाठी सारखे हवेत.
आमची अमित शहांकडे पहिली मागणी अशी आहे, की तुम्ही देशाचे केंद्रीय मंत्री आहात, केवळ मध्यप्रदेशपुरते नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जे रामलल्लाचे भक्त आहेत. त्यांना त्यांच्या सोयीनुसार मोफत अयोध्यावारी करावी. आचारसंहितेत केलेला बदल केवळ भाजपलाच सांगितला आहे का? अमित शाह आणि मोदींनी जर चुकीचे केले नसेल तर आम्ही जे त्यावेळी केले ते योग्य की अयोग्य होते ते कळू द्या. आता नियमावलीत ढिलाई आणली असेल तर आम्हीसुद्धा तसा प्रचार करू शकतो की नाही, ते त्यांनी सांगावे, असाही निशाणा उध्दव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर साधला.
पंतप्रधान ज्याअर्थी बजरंगबली की जय म्हणत, मतदानाचं बटण दाबण्याचं आवाहन करतात, त्याप्रमाणेच आम्ही देखील येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम बोलून मतदान करा. राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा मोरया बोलून मतदान करा, असेही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, अद्वय हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर कारवाई होत नाही, उलट आमच्यावर कारवाई होते. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.