मुंबई : नाव, धनुष्यबाण चोरलं, ठाकरे नाव कसं चोरणार? काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत. ज्यांच्याकडे संस्कार नसतात त्यांना चोऱ्या कराव्या लागतात. तसं त्यांच्या पूर्ण खानदानाने लिहून घेतलं. चोरीचा मामला, हळूहळू बोंबला, हे मोठ्यानं बोंबलत आहेत, असा जोरदार हल्लाबोल उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने स्थानिय लोकाधिकार महासंघाच्या वतीने 'जागर मराठी भाषेचा' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, गेली अनेक वर्षे ही घोषणा आपण ऐकतो. पण, मी आज ही पूर्ण घोषणा होईपर्यंत ऐकली. नाहीतर त्याच्यावर पण दावा टाकतील, असा मिश्कील टोला उध्दव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला शिंदे गटाला लगावला. सध्या आजोबा चोरताहेत, वडील चोरत आहेत. मी कधी विचार केला नाही आपलं काय होणार. आज सहज एक कोणीतरी फोटो पाठवला. त्यात दिवाकर रावते होते. आज जी 3-4 लोकं आहेत सोबत ती बाळासाहेब यांच्यासोबत होते.
आज दरवाजे तोडून मराठी माणूस पुढे आला आहे. तो काळ वेगळा होता. त्याकाळी कशी मराठीची अवहेलना होत होती. आपली मराठी मंत्रालयाच्या दाराशी फाटक्या अवस्थेत उभी आहे. घाटी म्हणून बोलायचं. त्यावेळी बाळासाहेब यांनी शिवसेना नावाची तलवार दिली. आताचे जे पावटे आहेत, तेव्हा ते नव्हते. दादरच्या घरी शिवसेनेची स्थापना झाली. चंदू मामा त्यावेळी होते. त्याचे हे साक्षीदार आहेत. तेव्हा मार्मिक छापायला देत नसत. दिवाकर रावते मार्मिकचे गठ्ठे घेऊन जायचे, त्यांच्याच घरी प्रेस होती. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला आत्मविश्वासाची तलवार दिली. बाळासाहेबांनी दुसऱ्यांच्या पालख्या वाहायला शिकवलं नाही, अशी निशाणा त्यांनी शिंदे गटावर साधला आहे.
नाव, धनुष्यबाण चोरलं, ठाकरे नाव कसं चोरणार? काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत. ज्यांच्याकडे संस्कार नसतात त्यांना चोऱ्या कराव्या लागतात. तसं त्यांच्या पूर्ण खानदानाने लिहून घेतलं. चोरीचा मामला, हळूहळू बोंबला, हे मोठ्यानं बोंबलत आहेत. फुलं तोडली म्हणजे झाड संपत नाही. अनेकदा बांडगुळ तोडावी लागतात, ती तोडली आहेत. अनेकदा बांडगुळांना वाटतं की तो झाड झालाय. पण, ज्या ज्या वेळी ते छातीवर धनुष्यबाण लावतील, तेव्हा त्यांच्या कपाळावर चोर लिहिलेलं असेल. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो. आता अनिलने मला धनुष्यबाणात मशाल दिली. आता परिता लावायची वेळ आलेली आहे. शिवसेना हा धगधगता विचार आहे. मोगॅम्बोच्या जरी पिढ्या उतरल्या तरी काही होणार नाही.
अफजल खानने खलिते पाठवले होते. तेव्हा खंडूजी खोपडे यांना खलिता आला ते गेले ईडीच्या भीतीने. जानोजी जेधे यांना खलिता आला, तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे गेले. तेव्हा महाराजांनी सांगितलं जा मग तिकडे. तेव्हा जेधे यांनी तिथलं पाणी घेतलं आणि वतनावर, मुलांवर फेरलं. पण आज किती खंडूजी खोपडे च्या पिढ्या जन्मास आल्या आहेत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.