सचिन बडे | औरंगाबाद : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचे पारडे जड भरत असले तरी दुसरीकडे नोटाला दुसरी पसंती पाहायला मिळत आहे. मात्र, काही जरी झालं तरी विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचाच होणार, असा विश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
सत्तांतरानंतर आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सात फेरींचे निकाल हाती आले असून उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. परंतु, या निवडणुकीत ऋतुजा लटके विरुध्द नोटा असा सामना रंगताना दिसत आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, काही जरी झालं तरी विजय हा ऋतुजा लटकेंचाच होणार आहे. नोटाला पडणारा मतांचा आकडा हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तर, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची नटी असा उल्लेख केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली असून गुलाबराव पाटलांना सोंगाड्या असे म्हंटले आहे. गुलाब पाटील हे सोंगाड्या आहेत. ते फक्त सोंग करतात, खलनायक स्वरूपाचे काम करतात, असा टोला दानवेंनी लगावला आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या 19 फेरी होणार असून 7 फेऱ्यांचे निकाल हाती आलो आहेत. पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. यामुळे लटकेंचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.