मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवत दोन्ही गटाने नवे चिन्ह आणि नाव दिले. परंतु, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहीत निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही भेदभाव केला, असा आरोप करत ठाकरे गटाने केला आहे.
निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे. नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध गटाला झुकतं माप दिले. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही गटांचे पर्याय सारखेच कसे होते? अशी विचारणा ठाकरे गटाने पत्रांतून केली आहे. ठाकरे गटाने 12 मुद्यांचे पत्र निवडणूक आयोगाला लिहीले आहे.
दरम्यान, धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल, असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते. शिंदे गटानेही त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. परंतु, दोन चिन्हे सारखी असल्याने निवडणूक आयोगाने त्रिशूळ व उगवता सूर्य हे चिन्ह फेटाळले. मोठ्या राजकीय घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव व ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.