अनिल ठाकरे | चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलवा, अन्यथा राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, असा रोखठोक इशारा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने कॉंग्रेसला दिला आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र शिंदे यांनी हा इशारा कॉंग्रसेच्याच नेत्यांसमक्ष दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुख्य कार्यालयात आयोजित सहकार मेळावा व नवनिर्वाचित बाजार समिती सभापती व उपसभापती तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलवा, अन्यथा राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रवींद्र शिंदे यांनी कॉंग्रेस नेत्यांसमक्ष दिला.
यादरम्यान माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे, आ. ॲड.अभिजित वंजारी आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे उपस्थित होते. सहकारी पक्षाच्या बँक संचालकानेच इशारा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. अजित लाभे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ, काँग्रेसचे पदाधिकारी, सहकार विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, घराबाहेर पडल्यानंतर आम्ही परत घरी जाणार की नाही, याची खात्री राहिलेली नाही. आज या जिल्ह्यातील वातावरण अतिशय गढूळ झाले आहे, असे त्यांनी सांगितले.