मुंबई : राज्यात सध्या कलंक या शब्दावरुन राजकीय वातावरण तापले आहे. यावर ठाकरे गटाचे मुखपत्र सामना मधून भाजपवर शरसंधान साधले आहे. सर्व प्रकारचे कलंक धुऊन देण्याची योजना सध्या भाजप राबवीत आहे. आमच्यात सामील व्हा व ‘डाग’ धुऊन घ्या अशी ती योजना. तरीही ‘कलंक’ शब्दाचा किती मोठा धसका भाजपने घेतला ते महाराष्ट्राने पाहिले, अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपवर टीका केली आहे.
महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, परंपरा पूर्णपणे कलंकित करण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षाने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू केली व त्याचे भीष्म पितामह नागपुरात बसले आहेत. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळेच राजकीय विरोधकांना व्यक्तिगत शत्रू मानून चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे ‘फडतूस’, ‘कलंक’ अशा शब्दांचा वापर महाराष्ट्रात जोरकसपणे सुरू आहे.
शिंदे गट व नव्याने आलेला अजित पवार गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे व खासगीत एकमेकांविषयी कोणत्या शब्दांचा वापर होतोय ते वेशभूषा बदलून कोणीतरी जाऊन ऐकायला हवे. पुन्हा दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे संबंधही बरे नाहीत. त्यांच्यातला संवाद वरवरचा आहे. त्यात आता अजित पवार व त्यांचे चाळीस लोक आले. त्यामुळे शिंदे गटाची हवाच निघाली, असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकीय शेरेबाजी चालते. राज्यप्राप्तीसाठी औरंगजेब आपल्या जन्मदात्या पित्यास कैदेत ठेवू शकला आणि सख्ख्या भावाचा खूनही केला. महाराष्ट्राने शिवरायांचा मार्ग सोडला. तो वेगळय़ाच मार्गाने निघाला. हा मार्ग दिल्लीतील ‘शाह य़ांचा’ व औरंगजेबाचा असू नये इतकेच, असेही ठाकरे गटाने म्हंटले आहे.