नवी दिल्ली : राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जसा जवळ येऊ लागलाय तसा ठाकरे गट आणि भाजपमधील श्रेयवादाची लढाई तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतं आहे. तर, निमंत्रणावरुनही मोठा वाद पाहायला मिळत आहे. अशातच, राम मंदिराच्या उदघाटनात कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधीचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.
वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या माजी प्रमुख सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने त्यांना निमंत्रण पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारला असता तुम्हाला पक्षाची भूमिका लवकरच कळेल, असे म्हंटले आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत अनेक विरोधी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश डाव्या नेत्यांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.