नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. यावरूनच काल राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यातच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. त्यातच आज या निवडणुकीवरून मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत शुभांगी पाटील या नाशिक पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुक अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. पाठिंबा मिळाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे आभार मानले असून, त्यानंतर त्यांनी सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी महाविकास आघाडीचे आभार मानते त्यांनी अगदी योग्य निर्णय घेतला आहे. 'अब राजा का बेटा राज नही बनेगा' ज्याच्यामध्ये खरच गुणवत्ता आहे तो निवडून येईल, असं म्हणत त्यांनी तांबे यांच्यावर निशाणा साधला.
पुढे त्या म्हणाल्या की, शिवसेनेने पाठिंबा दिलाय, त्याप्रमाणे महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते. पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देतेय. तर 45 ते 50 हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर 6 दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केलंय. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.