शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा पार पडली. याच सभेत बोलताना उध्दव ठाकरेंनी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. अशा शब्दात त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?
जळगावमधील सभेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल. असे निशाणा त्यांनी यावेळी आयोगावर साधला.
पुढे ते म्हणाले की, काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत. अशी टीका त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केली.