आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ही जयंती साजरी केली जात आहे. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जयंतीवरून चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच आज विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचा अनावरण होत आहे. तर दुसरीकडे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. याच मेळाव्यात बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
मी शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करुन आलो. त्यांचा आज जन्मदिवस. आज सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस. आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय. मला विचारतात की त्या तैलचित्राचं काय? मी म्हटलं ते बघितलेलं नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारलं असेल त्यांचा मला अपमान करायचा नाही. पण त्यांना पुरेसा वेळ दिला गेला असेल का? ते महत्त्वाचं आहे.
घाईगडबडीत काहीतरी रंगवून घ्यायचं आणि हे तुझे वडील. तर अजिबात ते चालणार नाही. दुसऱ्याचे वडील चोरताना हे लक्ष ठेवा नाहीतर तेही तुम्ही विसरायचे. इकडे शिवसेनाप्रमुखांचा विचार, तिकडे मोदी का आदमी आणि तिकडे शरद पवार गोड माणूस. नक्की कोणाची बोटं लावणार तुम्ही? महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पाडलं? तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत.
तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे. जसं नेताजींच्या मुलीने सांगितलं, शताब्दी जरुर साजरी करा. पण त्यांचे विचार मान्य आहे का? त्या बोलल्या आहेत की, सरळसरळ वारसा हडपण्याचा प्रकार आहे. असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.