मुंबई : भाजप समर्थित आमदार रवी राणा व शिंदे गट समर्थित आमदार बच्चू कडू यांच्यामधील वाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीने संपला आहे. परंतु, अद्यापही या दोघांमध्ये धुसफूस सुरु असून एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) सामना संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात 50 आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे. त्यामुळे त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. नैतिकता आणि विचारांचे सूत्र नाही. महाराष्ट्राविषयी आस्था नाही. मिंधे गटाचे एक मंत्री गुलाब पाटील यांनाही खोक्यांचा आरोप काटय़ांप्रमाणे टोचला आहे व त्यांनीही खोक्यांचा आरोप करणाऱ्या राणा यांच्यावर डोळे वटारले. मात्र याच गुलाब पाटलांवर त्यांच्याच जिल्हय़ातील मिंधे आमदार चिमण पाटील यांनी हल्ला केला. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्याची इज्जत खुंटीला टांगून सरकार चालवले जात आहे, अशा शब्दांत शिवसेनेने शिंदे गटावर टीका केली.
मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण कोणतेही खोके दिसले की लोकांना पन्नास बेइमान आमदारांचीच आठवण होणार. या बेइमानांच्या राजकीय चिताही खोके रचून पेटविल्या जातील असा संताप लोकांत खदखदत आहे. आज तुम्ही एका राणांना समजावले, पण अमरावती व राज्याच्या जनतेला कसे समजावणार? आणि किती लोकांवर बदनामीचे खटले दाखल करणार? ‘खोक्यांचा आरोप मी कदापि सहन करणार नाही’, असे बच्चू कडू यांनी तळमळून सांगितले. कडू यांनी अपंगांसाठी आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले, पण एकदा गुवाहटीला गेल्याने त्या कामावर बदनामीचे ‘खोके’ पडले, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.
रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार, असा टोलाही शिवसेनेने शिंदे गटाला लगावला आहे.