मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यानंतर शिंदे गटाने आता विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला आहे. यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप जारी करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, हा व्हिपठाकरे गटाच्या आमदारांसाठीही लागू असणार आहे. यामुळे ठाकरे गट हा व्हिप पाळाणार की धुडकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षनाव व चिन्ह शिंदे गटाला भेटल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील हालचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. सर्व 56 शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार असून हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू असणार आहे. तसेच, जर कुणी व्हीप पाळला नाहीतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरदार गाजणार आहे.
तर, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले. याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून नाशिक व ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत चांगलं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंना संपवण्याचं काम करत आहेत. आमचं काम सोपं करत आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत खासदार व वरिष्ठ ठरवतील. मुख्यमंत्र्यांविषयी बोलल्या प्रकरणी दोन गुन्हे झालेत अजून गुन्हे नोंद होणं बाकी आहेत. राऊतांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील, अशी टीका गोगवलेंनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. यादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात ठाकरे गटाचा आक्षेप आहे. याबाबतही युक्तिवाद या तीन दिवसांत केला जाऊ शकतो. परंतु, त्याआधीच ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? हे सुद्धा पाहण्याचे ठरणार आहे.