मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सरकार अल्पमातात आले असून कोसळणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संवाद नाराज आमदारांना भावनिक साद घातली. तर, आज शिवसेनेचे मुखपत्र सामानातून वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!ठरवले तर सगळेच कायमचे 'माजी' होतील, असा सूचक इशारा बंडखोरांना दिला आहे.
सामाना म्हंटले की, राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील 'जादा' विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली.
सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे 'माजी' होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा इशारा बंडखोरांना देण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बुधवारी म्हंटले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, असे सांगितले आहे. यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला गेले आहेत.
तर यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शिंदेंनी म्हंटले आहे.