राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरून जोरदार जुंपली आहे. शिंदे- फडणवीस सरकार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते यांच्यामध्ये उद्योगावरून मागील काही दिवसांपासून चांगलीच जुंपलेली होती. याच वादात काल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्यसरकारवर मुंबईच्या रस्त्यांच्या कंत्राटावरून टीका केली होती. त्यावरच आता शिंदे गट प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले की, ही कामं होऊन मुंबई खड्डेमुक्त झाली तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले दवाखाने होत आहेत. ते झाले तर आमचं काय होणार. मुंबईत चांगले सौदर्यीकरण होत आहे. मुंबईतील जीवन बदलत आहे, तर आमचं काय होणार. हा विचार तुम्हाला पिळतोय. म्हणून तुमची ही आदळ आपट चालली आहे. असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.
पुढे ते म्हणाले की, ठाकरे गटाने ग्रामपंचायतीपासून धसका घेतला आहे. ग्रामपंचायतीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या क्रमांकावर भाजप आली. दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि नंतर उद्धव ठाकरे (उबाठा) यांनी शिवसेना होती. उबाठा सेना होती.
वेगवेगळ्या ठिकाणी सोयरिक शोधले जात आहेत. अनेक लोकांशी सोयरिक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ते चिंतेत आले असतील. त्यामुळं यांना घाई झाली असेल. निवडणुका लवकर घ्या, असं त्यांना वाटत असेल, काहीही केलं तरी आम्ही ते ठरविलं होतं. पण, आम्ही ते करू शकलो नाही. ४-५ महिन्यात कोणी काही करत असेल, तर त्यामागे मेहनत असते. ती मेहनत कोणीतरी करते. याबद्दल कोणीही पोटदुखी करून घेऊ नये, असे देखील केसरकर यावेळी म्हणाले.