राज्यात एकीकडे दररोज अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडताना दिसत आहे. अशातच नुकताच काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. सोबतच शिंदे गटातील काही आमदार मंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळा विस्तारात शिंदे गटातील आमदारांची नाराजी दूर आहे, असे सांगण्यात येत आहे. अशातच शिंदे गटातील रामदास कदम यांनी शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले रामदास कदम ?
रामदास कदम मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार 15 किवां 20 तारखेपर्यंत होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल, असा विश्वास रामदास कदम यांनी बोलताना व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा फायदा अजितदादांनी घेतला आहे, असा गंभीर आरोप कदमांनी पवार यांच्यावर केला. आमदार,खासदार, मंत्री त्यांच्याकडे वेळ मागत होते तेव्हा त्यांच्याकडे वेळ नव्हता. पन्नास आमदार स्वतः कंटाळून बाजूला गेले नाहीतर सर्व संपले असते, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होता, त्याला 16 टक्के निधी आणि बाकीच्यांना जास्त निधी, असं रामदास कदम बोलताना म्हटले.
या आधी मुनगंटीवार यांनी केले होते मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाष्य
मागील काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार लवकरच होणार आहे. असे विधान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 मंत्र्यांची भर पडू शकते. कारण सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. म्हणजेच एकूण 43 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं. सध्या 20 मंत्री राज्याचा कारभार पाहात आहेत. त्यामुळे आणखी 23 जणांना मंत्रिमंडळास स्थान मिळू शकते, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.