मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. शिंदे आणि भाजपमधील अनेक खाती अजित पवार गटाला देण्यात आलेली आहेत.
'ही' खाती अजित पवार गटाला
अर्थ खाते
राज्यात महत्त्वाचं मानलं जाणारे अर्थमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आले होते. परंतु, ते आता अजित पवारांना देण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण
गिरीष महाजन यांच्याकडे हे खाते होते. परंतु, आता वैद्यकीय शिक्षण खाते हसन मुश्रीफ यांना देण्यात आलेले आहे. यामुळे महाजनांकडे आता ग्राम विकास आणि पंचायती राज, पर्यटन खाती आहेत.
महिला व बालविकास
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रणिती शिंदे यांना पहिल्या महिला मंत्रिपदाचा मान मिळाला असून महिला व बालविकास खाते सोपविण्यात आलेलं आहे. याआधी हे खाते मंगलप्रभात लोढा यांच्या अखत्यारित होते.
क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
नव्या खातेवाटपात हे खाते संजय बनसोडे यांना देण्यात आलेलं आहे. हे खाते आधी गिरीष महाजनांकडे होते.
कृषी खाते
कृषी खाते हे अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. परंतु, नव्या खातेवाटपानुसार कृषी मंत्रिपदी आता धनंजय मुंडे यांना मिळालेले आहे. तर, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक, विकास आणि पणन खाते मिळाले आहे.
अन्न व औषध प्रशासन
हे खाते आधी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे होते. हे खाते आता अजित पवार गटाचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांना देण्यात आलेले आहे. तर, संजय राठोड यांना मृद व जलसंधारण खाते दिले आहे.
सहकार
राज्यातील महत्वाच्या खात्यांमध्ये सहकार खाते गणले जाते. नव्या यादीनुसार हे खाते दिलीप वळसे-पाटील यांना देण्यात आले आहे. तर, याआधी सहकार खाते अतुल सावे यांच्याकडे होते. सध्या सावे यांच्याकडे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण खाते आहे.