कोल्हापूर : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तर, सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगली होती. यावर अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय कशाला काढता, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच, बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहणार नाही, असं एकंदरीत चित्र आहे.
कर्नाटकात लोक परिवर्तनासाठी इच्छूक आहेत. विरोधकांची मोट बांधण्यासाठी आपल्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी काम करत आहेत, त्याची सध्या काय स्थिती आहे? मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकूल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरे जावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या दाव्यावर अजित पवारांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापीही काढणार नाही, अशा शब्दात त्यांनी बोलणे टाळले.