मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असल्याची माहिती मिळत आहे. यानुसार शरद पवारांना आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. पवार यांना निमोनिया झाल्याची माहिती राष्ट्रवादीने पत्रकातून दिली होती. उपचाराकरीता शरद पवार यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.
तर, प्रकृती ठिक नसतानाही शरद पवार आधी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे व नंतर प्रत्यक्ष शिर्डीतील राष्ट्रवादी मंथन शिबिरमध्ये हजर राहिले होते. परंतु, प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार यांनी भाषण सुद्धा केलं नव्हतं. त्यांचं भाषण हे दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं होतं. यानंतर आज शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दहा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे
दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या भारत जोडो यात्रेत आता शरद पवार हेही सहभागी होणार होते. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार आता भारत जोडो यात्रेल उपस्थित राहणार नसल्याची शक्यता आहे.