नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठा विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मिळाला आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला आहे.
बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात हायव्होल्टेजज ड्राम रंगला होता. या निवडणुकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांच्याऐवजी अचानक सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा जाहीर केला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सुरुवातीलापासूनच कांटे की टक्कर दिसून आली होती. अशातच, नाशिक पदवीधर दोन फेरीच्या मतमोजणीवेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.