मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर शिवसेनेकडून ठाण्यातील शिवाईनगर शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात असाल तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
हा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण या गटाने अस्तित्व ठाण्यापुरतंच मर्यादित आहे. मात्र हे देखील लवकरच संपेल. सत्तेचा आणि पोलिस बळाचा गैरवापर होतोय, हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचं काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे सरकारवर केली आहे.
मी सकाळी चांगलंच बोलतो, ठाण्यात जे सुरु आहे ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप तुमचा वापर करते आहे हे तुम्हाला कळेल की तुम्ही किती चूक केली आहे. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात असाल तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही. सत्ताधारी बेकायदेशीर आहे मी त्यांना काय सांगणार, असा टोलाही त्यांनी लगावला आबहे.
दरम्यान, भगवा रंग तर आम्हाला प्रिय आहेच. मात्र, कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. सर्व रंग हे निसर्गाने दिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवले, त्यामुळे भगवा प्रियच आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.