एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यानंतरही राज्यातील राजकारण काही शांत झाले नाही. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतर यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांच्यावर बंडखोरांकडून टीका केली जात आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता योजना आखली आहे.
युवा नेते आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले असून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामानातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी कार्यकारी संपादक संजय राऊत त्यांची मुलाखत घेणार आहेत.
स्वत: राऊत यांनी आज ही योजना सांगितली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत हे ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामध्ये ठाकरे टोकदार उत्तरे देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ही मुलाखत सामनामध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. आजच्या सामनामध्ये या मुलाखतीबाबात माहितीही देण्यात आली आहे.
गद्दारांनी केला पाठीवर वार, मग आता वाचाच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार! अशा मजकूरासह सामनाच्या पहिल्याच पानावर मुलाखतीबाबात माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत या मुलाखतीची माहिती दिली आहे. 26 आणि 27 जुलै रोजी ही मुलाखत आपल्याला पाहता येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. ‘जोरदार मुलाखत..सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत..’ असेही ट्वीट संजय राऊत यांनी केलेय.